पावसाळ्यात धबधबा हे पर्यटनासाठी सर्वांचच एक आवडत ठिकाण असतं. पाऊस पडला की डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांच पांढराशुभ्र दुधासारखं पाणी आवडणार नाही असा एकही मनुष्यप्राणी ह्या पृथ्वीतलावर असेल असं मला वाटत नाही. माणसाच्या जीवनात जसं संगीताचं स्थान तसंच धबधब्याचं आहे हे निश्चित म्हणता येईल. पंधरा ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम उरकून धबधब्यावर जायचं असा खास बेत आमच्या लाईफपेसर ह्या धावपटूंच्या क्लबच्या सदस्यांनी आखला होता . सर्वानी ठीक अकरा वाजता धबधब्यावर पाचारण केलं. मला काही कारणास्तव जायला उशीर झाला व त्यामुळे मी एकटाच मागे राहिलो. आणि एकटाच राहिल्याने आयुष्यात पहिल्यांदाच मला धबधबा एका वेगळेपणानं पाहता आला, अनुभवता आला.
एका संकेतस्थळावर गाडी पार्क करून जीपीएस च्या मदतीने धबधब्याच्या दिशेने कूच सुरु होती. पायवाटेवर फक्त मी आणि मीच होतो. तशा त्या निरामय शांत वातावरणात कदाचित चकवा लागेल ही भीती मनात आली आणि त्या तंद्रीतून जागा झालो. वाटेत एक गुराखी भेटल्याने त्याला नक्की दिशा विचारावी म्हणून प्रश्न केला की ," धबधबा कोणत्या दिशेला आहे ?" त्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. माझ्या लक्षात आले कि त्याला प्रश्नच कळला नाही. मी पुन्हा प्रश्न फिरवून विचारला की, " वॉटर फॉल कोणत्या दिशेला?". त्याने पटकन उंगलीनिर्देश करून मला दिशा दाखवली. मी मनातच हसलो आणि इंग्रजांचे आभार मानले.
आता त्या दिशेला पाण्याच्या खळखळाटातून निर्माण झालेलं संगीत मंद ऐकू येऊ लागलं होतं. आणि माझी चालण्याची दिशा बरोबर आहे हे नक्की होत होतं. आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढी निरव शांतता आणि त्यामध्ये पाण्याचा हा मधुर नाद ऐकत होतो. आणि हो.... पहिल्यांदाच मी धबधबा ऐकत होतो. माझं लक्ष फक्त आणि फक्त त्या नादाकडे असल्याने त्या जंगलातून एकटं चालताना मला दुसरं काहीच आठवलं नाही की कसलं भय वाटलं नाही. मी चालता चालता एक स्वर्गीय अनुभव अनुभवत होतो. हळूहळू एक मोठा पाण्याचा प्रवाह ओलांडून मी शेवटी धबधब्यावर पोहोचलो.
क्लबमधील सदस्य हे सहकुटुंब असल्याने त्यांची मुलं- मुली पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटत होते. ज्यांची वय ३० ते ४० च्या घरात होती ते सर्व पाण्यात डुंबत, एकमेकांवर पाणी उडवत आनंद घेत होते, जल्लोष करत होते. ४०-५० वयोगटातील देखील पाण्यात होते परंतु त्यांच्यात एवढा जोश दिसत नव्हता. ते मजा घेत होते पण त्यांचं लक्ष त्यांच्या मुलांवर जास्त होतं आणि स्वतः देखील थोडे सावध पणे पाण्यात फिरत होते तर काही पाण्यात पाय टाकून बसले होते. काही जण नवीन प्रचलीत पद्धतीनुसार नुसतेच फोटो काढण्यात गुंग होते. धबधब्यावर छत्री घेऊन जाणाऱयांपैकी मात्र आम्ही एक दोघच होतो. आम्ही मात्र छत्री घेऊन धबधब्याच्या कडेला अगदी सावधपणे पाण्यात पाय टाकून बसलो होतो.
त्यादिवशी पहिल्यांदा मला धबधबा नुसता पहावासा वाटत होता. मी कडेला बसून पुन्हा पुन्हा तो पाण्याचा आवाज कानात साठवून ठेवत होतो. आणि वाहत जाणारं पांढरशुभ्र पाणी डोळ्यात साठवून घेत होतो. पाण्यात खेळणार्याचा आनंद देखील पाहण्यात मला वेगळीच गंमत येत होती. हे सगळं मला त्यादिवशी का वाटत होतं कोणास ठाऊक पण मला पाण्यात जावंस वाटलं नाही की डुंबावं वाटलं नाही. आणि हल्ली माझ्यात होणारा हा बदल माझ्या लक्षात येत होता. आणि म्हणून त्यादिवशी मी अनुभवलेला धबधबा काही वेगळाच होता.
मी निस्तब्ध होतो आणि धबधबा मात्र अवखळ, लहान मुलासारखा उड्या मारत होता. लहानमुलांसारखा कशाला , त्याचा जन्मच तिथे झाला होता. त्यामुळे आम्ही दोघंही वयं पहाता एकदम विरुद्ध असलो तरी आपापल्याठिकाणी आम्ही दोघंही जीवनाचा आनंद घेत होतो किंबहुना मी कदाचित माझी आनंद घेण्याचं व्याख्या बदलली होती. फरक फक्त एवढाच होता की माझा प्रवास उलट्यादिशेचा म्हणजे जास्त वया कडून नवजात अर्भका कडे होत होता आणि त्याचा मात्र नुकताच जन्म होऊन तो जीवनप्रवासाला निघाला होता. त्याचं हे बालपण होतं म्हणून तो ईतका अवखळपणे खळखळाट करत होता तर मी तितकाच शांतपणे त्याच्याकडे पहात होतो आणि कौतुकाने त्याचं रांगण पाहत होतो. आज पहिल्यांदा एक धबधबा मला लहानमुलासम भासत होता....
त्याचा जीवनप्रवास सुरु झालाय. कधीनाकधी तो वाहत वाहत , जसं वय वाढत जाईल तसा एकानदीमध्ये विलीन होईल. कालांतराने त्या नदीवर बांध घातला जाईल. आपल्या बाबतीत जबाबदाऱ्याचा बांध घातला जातो तसा त्यालाही निसर्गाने कुठली तरी जबाबदारी देऊन त्याच्या अवखळपणे वाहण्यावर बांध घातलेलाच असेल. त्यावेळी तो धबधबा माझ्यासारखा निस्तब्ध दिसेल. माझ्यात त्या क्षणी असलेलं निस्तब्धतेपण हे माझ्या वाढलेल्या वयामुळे असेल का? असा प्रश्न देखील मला पडला. कारण माझ्या मनात जन्म घेतलेल्या धबधब्याचं आता धरण झालंय आणि त्याचं बॅक वॉटर मला सतत जबाबदाऱयांची जाणीव करून देतंय आणि त्या जाणीवा मला बऱ्याचदा अंतर्मुख करून शांत ठेवतायत असं मला वाटत होतं. इंजिनियरिंगच्या भाषेत त्याच पाण्यावर जास्त दबाव असतो जे पाणी शांत दिसतं. मराठीत एक म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार हे अगदी तंतोतंत खरं आहे आणि त्याची प्रचीती मला येत होती. माणूस ह्यातूनच पुन्हा उथळ होण्याचे मार्ग शोधतच असतो पण मुळातच त्याचं धरण झालं असल्यानं त्या सगळ्या माकडउड्या वाटतात. म्हणून कदाचित माझा मूळ स्वभाव तसा नसला तरी त्यादिवशी एकएका प्रश्नाचं उत्तर मला मिळत गेलं आणि मी शांतशांत होत गेलो. हल्ली मला धबधबा, समुद्र का आवडत नाही ह्याचं त्यादिवशी उत्तर मिळालं होतं. आनंद घेण्याचा परीघ आता बदललाय हे निश्चित झालंय. पण मला खंत नव्हती कारण एक अभूतपूर्व शांतता मी अनुभवत होतो, डोळ्यात साठवून ठेवत होतो.
दुपारचं जेवण त्याच अवखळ धबधब्याच्या सानिध्यात सर्वानी केलं. आणि परतीची वाट धरली. वाटेवर चालताना त्याचा आवाज प्रत्येक पावलागणिक मंद होत गेला. मला त्या धबधब्याने माझ्या मधल्या निस्तब्धतेच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं होतं. पण तरीही मी त्यादिवशी अनुभवलेला धबधबा हा अतिशय वेगळा आनंद देणारा होता हे मात्र निश्चित.....
डॉ. संजय मोतलिंग
( १८ . ०८. २०२२ )
Comments